जामनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू.. हातगाडी, टपरीधारकांमध्ये नाराजी, राष्ट्रवादीचे दिलीप खोडपे करणार हस्तक्षेप
जामनेर शहरात नगर पालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील अनेक रस्त्यांवरून हातगाड्या, टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ही कारवाई शहराच्या सौंदर्यासह वाहतुकीची सुविधा सुधारण्यासाठी केली असली, तरी त्यामुळे हातगाडी व टपरीधारकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.रस्त्यावर हातगाड्या व टपऱ्या लावून अनेक छोटे व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करतात. परंतु अचानक आलेल्या या कारवाईमुळे त्यांची उपजीविका संकटात आली आहे. अनेक जण बेरोजगार होण्याच्या भीतीने हवालदिल झाले आहेत. या संदर्भात प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी प्रभावित व्यावसायिकांकडून केली जात आहे.
या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खोडपे पुढील दोन दिवसांत संबंधित प्रशासनाशी चर्चा करून नागरिकांची बाजू मांडणार असल्याचे सांगितले आहे. या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील अनेक नागरिकांनीही या कारवाईवर नाराजी व्यक्त करत प्रशासनाने काही प्रमाणात माफक तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. आता प्रशासन व स्थानिक नेत्यांमध्ये या मुद्द्यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा