भुसावळ रेल्वे स्थानकावर एक कोटी रुपयाच्या नकली नोटा बॅगेत सापडल्याने खळबळ....
भुसावळ - रेल्वे पोलिसांनी दोन संशयितांना तपासणीसाठी अडवल्यानंतर त्यांच्या बॅगमधून तब्बल एक कोटी रुपयांच्या नकली नोटा सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन आरोपींपैकी एकजण पोलिसांना चकवा देत फरार झाला असून दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरहून भुसावळला येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी स्थानकावर अडवले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात नकली नोटांचे बंडल सापडले. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये केवळ वरची नोट खरी असून उर्वरित सर्व नोटा बनावट असल्याचे आढळले.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, नकली नोटांचा हा साठा कुठून आणला आणि कुठे पाठवला जाणार होता, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा