जळगावला मेडिकल हब बनवत आहोत – मंत्री गिरीश महाजन; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थ्री टी एमआरआय सेवा सुरु
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव, ३ मे – जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आजपासून अत्याधुनिक थ्री टी एमआरआय सेवा कार्यान्वित करण्यात आली असून, या सुविधेमुळे जळगाव आरोग्यसेवेच्या दृष्टीने राज्यातील पहिलं हायटेक मेडिकल हब ठरत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते, तर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी आणि अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, “जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अद्ययावत एमआरआय, लेझर मशीन, मिल्क बँकसह आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून हे राज्यातील सर्व सुविधा असलेलं पहिलेच सरकारी रुग्णालय ठरत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी नमूद केले की, “मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे शक्य होणार असून, वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयांसह रुग्णालय एकत्र असलेले देशातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये साकारले जात आहे.
थ्री टी एमआरआय मशीनचे वैशिष्ट्ये
- मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानावर आधारित
- मेंदू, मज्जासंस्था, हृदय, सांधे, कर्करोग, पचनसंस्था, प्रजननसंस्थेची तपासणी
- किरणोत्सर्ग विरहित व सुरक्षित
- सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करणारे अद्ययावत तंत्रज्ञान
रुग्णांसाठी सूचना
- धातुरहित कॉटनचे कपडे परिधान करणे
- धातूची कोणतीही वस्तू अंगावर ठेवू नये
- जुने तपासणी अहवाल सोबत आणावेत
- पेसमेकर, कॉक्लीअर किंवा इम्प्लांट असणाऱ्यांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणावे
या सेवेचा जळगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी केले.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा