जिल्हा परिषद आपल्या दारी" उपक्रमाला जामनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी घेतला थेट तक्रारींचा आढावा - दैनिक शिवस्वराज्य

जिल्हा परिषद आपल्या दारी" उपक्रमाला जामनेरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी घेतला थेट तक्रारींचा आढावा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दि. ५ जून २०२५ – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जामनेर पंचायत समितीत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, एकूण २५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.

या तक्रार निवारण सभेच्या विशेषतेपैकी एक म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल स्वतः उपस्थित राहून तक्रारदारांचे प्रश्न ऐकून घेतले आणि संबंधित विभागप्रमुखांसोबत चर्चेतून तत्काळ तोडगे काढले. नागरिकांच्या समस्यांचे गंभीरतेने आणि प्रभावी पद्धतीने निराकरण करतानाच, त्यांनी विभागीय अधिकारी व ग्रामसेवकांना आवश्यक सूचना व मार्गदर्शनही केले.
या कार्यक्रमावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, सिंचन विभागाचे अभियंता अमोल पाटील आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ही सभा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. उपस्थित नागरिकांनी स्वतः आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर जागेवरच कार्यवाही होत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
तक्रारींपैकी अनेक तक्रारी घरकुल योजनांशी, जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीशी, तसेच सुरू असलेल्या बांधकामांच्या कार्यवाहीशी संबंधित होत्या. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांनी ऑनलाईन प्रणालीत अद्ययावत राहण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत माहिती मिळून तक्रारी टाळता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मिनल करनवाल म्हणाल्या की, गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांना किरकोळ तक्रारींसाठीही जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. हा त्रास टाळण्यासाठी आणि तक्रारींचे समाधान तालुका स्तरावरच व्हावे यासाठी ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी महिन्यातून दोन वेळा तालुकास्तरावर जाऊन तक्रार निवारण सभा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. जामनेर येथील सभा ही याच धोरणाचा एक भाग होती आणि याला ग्रामस्थ व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads