टी जे चौहान विद्यालय मोरवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त पवित्र दिंडी सोहळा उत्साहात साजरा
स्वामी विवेकानंद सोसायटी संचालित श्रीमान टी जे चौहान विद्यालय, मोरवाडी येथे आजचा दिवस खास भक्तिमय ठरला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत पवित्र दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग, झांज यांच्या गजरात विठ्ठलनामाचा गजर करत संपूर्ण परिसरात भक्तिरस पेरला.
या सोहळ्यात इयत्ता ५वी आणि ६वीचे विद्यार्थी विविध संतांची, वारकऱ्यांची तसेच विठ्ठल-रुक्मिणींची वेशभूषा करून सहभागी झाले होते. लहानग्या विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे, डोक्यावर फेटे, हातात तुळशी घेऊन “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!” अशा जयघोषात शाळा व गावातील रस्त्यांवर टाळ- मृदुंगाच्या तालावर सुसंवाद साधत सुंदर दिंडी काढली.
या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकतेचा संदेश आणि भक्तीची प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचवली. विठ्ठल-रुक्मिणींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे ‘वृक्ष दिंडी’ काढत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सिड बॉलचे वाटप करण्यात आले आणि ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला माळी मॅडम, पर्यवेक्षक श्री. कीर्तिकुमार गहाणकारी यांचे मार्गदर्शन लाभले. श्री. शिवाजी मोरे सर यांनी विठ्ठल नामस्मरणाचे व भक्तीच्या परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पालकवर्ग आणि गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा सन्मान दिला.
या भक्तिमय प्रसंगाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते
“संस्कारांची गोडी, भक्तीची ओढ आणि शिक्षणाची वाट याचं संगमच हे शाळेचं दिंडी सोहळा
विठ्ठल विठ्ठल! जय हरि विठ्ठल!
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा