विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या...
जामनेर तालुक्यातील पहूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, गोविंद नगर येथे राहणाऱ्या 18 वर्षीय महेश अनिल गोळ्हारे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्याने राहत्या घराजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे.
महेश हा इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामनेर बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. नेहमी हसतमुख आणि अभ्यासू असलेल्या महेशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अजूनही कळू शकलेले नाही.
घटनेच्या दिवशी महेश रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी घराजवळील शेडमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, महेशच्या अकाली निधनाने पालक, शिक्षक आणि मित्रमंडळींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा