पाचोरा उपविभागातील सहाय्यक अभियंता लाच घेताना रंगेहाथ पकडला — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - दैनिक शिवस्वराज्य

पाचोरा उपविभागातील सहाय्यक अभियंता लाच घेताना रंगेहाथ पकडला — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव, दि. 12 ऑगस्ट — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव युनिटने आज पाचोरा येथे सापळा रचून महावितरणच्या पाचोरा-2 उपविभागातील सहाय्यक अभियंत्याला 29 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

आरोपी मनोज जगन्नाथ मोरे (वय 38, रा. अभियंता नगर, संभाजी चौकाजवळ, पाचोरा) याने तक्रारदाराच्या सोलर फिटिंग कामाच्या 3 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी प्रत्येकी 3 हजार प्रमाणे 9 हजार रुपये आणि यापूर्वी पूर्ण झालेल्या 28 प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढल्याच्या मोबदल्यात प्रत्येकी 2,500 प्रमाणे 70 हजार रुपये, अशा एकूण 79 हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने 11 ऑगस्ट रोजी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागणीची खात्री झाल्यानंतर आज पाचोरा येथे सापळा रचण्यात आला. आरोपीने पहिल्या हप्त्याचे 20 हजार रुपये आणि चालू 3 प्रकरणांचे 9 हजार रुपये, अशा एकूण 29 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व पथकातील पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर व चालक सुरेश पाटील यांच्या सहकार्याने पार पडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास त्वरित 0257-2235477 या क्रमांकावर किंवा टोल फ्री 1064 वर संपर्क साधावा.





Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads