जामनेर तालुक्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत १००८ गरोदर मातांची मोफत तपासणी
जामनेर – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जामनेर तालुक्यात भव्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये आयोजित विशेष शिबिरांतर्गत १००८ गरोदर महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ६७४ माता पहिल्या तिमाहीतील तर ३३४ माता दुसऱ्या तिमाहीतील होत्या.
शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, एचआयव्ही, ओजीटीटीसह २२ प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. तसेच १६७ लाभार्थींना मोफत सोनोग्राफीसाठी संदर्भित करण्यात आले. तीव्र रक्तक्षय असलेल्या ३ मातांना आयर्न सुक्रोज उपचार देण्यात आले.
या मोहिमेत डॉ. दानिश खान, डॉ. संदीप कुमावत, डॉ. मोहित जोहरे, डॉ. कोमल देसले, डॉ. किरण पाटील, डॉ. शारिक कादरी, डॉ. संदीप जाधव, डॉ. सागर पाटील, डॉ. रोहिणी गरुड यांच्यासह सर्व समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका यांनी उत्साहाने सहभाग घेत शिबिर यशस्वी केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा