महाराष्ट्र
श्री गणेश उत्पादक कंपनी विंचूर यांनी नवकल्पना व नेतृत्वाच्या जोरावर गाठली नवी उंची...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (विंचूर) ; महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) तालुका दक्षिण सोलापूर येथील क्रांती महिला प्रभाग संघामधील उदयोन्मुख महिला उद्योजिकांचा श्री गणेश उत्पादक गट, विंचूर यांनी नव्या यशाची भर टाकली आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नवकल्पना आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यांच्या बळावर उभारलेले स्वतःचे दूध संकलन केंद्र आज विंचूर येथे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी गटाचे अध्यक्ष यांनी सांगितले की,
“दूध संकलन केंद्र ही संस्था क्षेत्रातील विश्वासार्ह आणि गतिमान संस्था म्हणून ओळखली जावी याकरिता आम्ही अविरत प्रयत्न सुरू ठेवणार आहोत.”
मर्यादित साधनांपासून सुरू झालेला श्री गणेश उत्पादक गटाचा प्रवास आज अनेक महिलांसाठी रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक उन्नतीचे नवे दार बनला आहे. त्यांच्या या यशाचे प्रभाग समन्वयक अतुल क्षीरसागर यांनी कौतुक करून भविष्यात ही एक आदर्श उत्पादक कंपनी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
समुदाय संसाधन व्यक्ती प्रमिला वांगेकर म्हणाल्या,
“हा व्यवसाय फक्त माझा किंवा आमच्या गटाचा नाही; तर प्रत्येक त्या महिलेसाठी आहे जी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचे धैर्य दाखवते. आमचे कार्य पुढील पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”
तालुका अभियान व्यवस्थापक शिवाजी वाघमारे यांनी गटाला आवश्यक त्या सर्व शासकीय योजनांमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विंचूर गावाचे सरपंच यांनी महिलांच्या उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देण्याबाबत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
प्रभाग समन्वयक अलीम शेख यांनी गटाने नवकल्पना, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वांवर सातत्याने प्रगती करत राहावी अशा शुभेच्छा दिल्या.
बँक ऑफ इंडिया, निम्बर्गी शाखेचे व्यवस्थापक पोपट चौधरी यांनी महिलांना गाई-म्हशी खरेदीसाठी कर्जप्रक्रियेमध्ये मार्गदर्शन व सहकार्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, मंद्रूप प्रभागातील सर्व संसाधन व्यक्ती, क्रांती महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष अंजुम पटेल, सचिव उमा बिराजदार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला वांगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल क्षीरसागर यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा