मोहाडी गावात कृषी दूतांचे आगमन; शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचे नवे दालन खुले
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रब्बी) २०२५–२६ अंतर्गत अंतिम वर्षातील कृषी दूत विद्यार्थ्यांचे मोहाडी गावात उत्साहात आगमन झाले आहे. या उपक्रमामुळे मोहाडीतील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा लाभ मिळणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. देवरे तसेच विविध विषयांचे तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दूत सिद्धेश सुपडुलाल जैन, युगल सुनिल ढाके, किरण सुधाकर इंगळे, विशाल शामकांत चौधरी, अक्षय सुभाष खोडपे आणि अक्कुलुरी नितीन हे विद्यार्थी पुढील काही कालावधीसाठी गावात वास्तव्यास राहणार आहेत.
या कालावधीत कृषी दूत शेतकऱ्यांसाठी
शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण
- विविध पिकांची योग्य लागवड पद्धती
- आधुनिक शेती तंत्रज्ञान व सुधारित तंत्रज्ञान
- पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन
- शाश्वत व किफायतशीर शेतीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व मार्गदर्शन
अशा विविध विषयांवर सखोल माहिती देणार आहेत.
या प्रसंगी कृषी दूतांसोबत ग्रामविकास अधिकारी मा. भास्कर पुंडलिक महाजन, सरपंच मा. दत्तात्रय दिनकर पाटील तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कृषी दूतांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले व पुढील काळात ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा व मार्गदर्शन करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमामुळे मोहाडी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा प्रत्यक्ष लाभ मिळून उत्पादनवाढीस हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा