महाराष्ट्र
महात्मा फुले जनआरोग्य योजना : हृदय–किडनी–कॅन्सर व हाडांवरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मिळत आहे. या योजनेत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 5 लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध असून एकूण 1356 प्रकारच्या उपचारांचा समावेश आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी स्वतंत्रपणे रु. 4.5 लक्ष पर्यंतचे संरक्षण दिले जाते. तसेच रस्ते अपघातग्रस्तांना प्रति व्यक्ती, प्रति अपघात रु. 1 लक्ष पर्यंतचा लाभ मिळतो, अशी माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शिधापत्रिका धारक, अधिवास प्रमाणपत्रधारक, बांधकाम कामगार, पत्रकार, अपंग, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमातील रहिवासी, तसेच महिला व बालविकास विभागाच्या वसतिगृहातील लाभार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
या योजने अंतर्गत कॅन्सर, हृदयविकार, यकृत व मूत्रपिंड विकार, मेंदू व मज्जासंस्था, नवजात बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, फुफ्फुस व पचनसंस्थेचे आजार, मानसिक आजार हृदयविकारासंबंधीत शस्त्रक्रिया एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी व किडनी संदर्भातील मुतखडे प्रोस्टेट ग्रंथीचे आजार व डायलिसिस अशा एकूण १३५६ उपचारांचा लाभ घेता येतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, अधिवास दाखला, ओळखपत्र, शाळा दाखला किंवा पत्रकारिता आयोगाचा दाखला आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १५५३८९ / १८००२३३२२०० या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आव्हान श्री. गुंजाळ यांनी केले.
योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या आजारांवरील उपचार :-
हृदयविकार :- हृदयाचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाला होल असलेले.
किडनीचे आजार :- किडनी स्टोन, प्रोस्टेट.
हाडांचे सर्व आजार :- हाड मोडलेले वगैरे.
मेंदूचे विकार :- पक्षाघात (लकवा मारणे), मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे, मेंदूत रक्तस्त्राव व त्यावरील शस्त्रक्रिया.
कॅन्सर :- रेडिओलॉजी शस्त्रक्रिया, केमोथेरपी या योजनेमार्फत मोफत उपचार केले जातात.
जनरल मेडिसिन :- साप चावलेले रुग्ण, विष प्राशन केलेले रुग्ण, डीप व्हेन थ्रोम्बोसिस.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा