जामनेरात मंत्री गिरीश महाजनांविरोधात जनआक्रोश मोर्चा - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरात मंत्री गिरीश महाजनांविरोधात जनआक्रोश मोर्चा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
प्रजासत्ताक दिनी नाशिक येथे दिलेल्या भाषणात संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक नामउल्लेख टाळल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आज जामनेर शहर अक्षरशः पेटले. आंबेडकरवादी, परिवर्तनवादी, समविचारी संघटना, सुज्ञ नागरिक आणि महिला भगिनी यांच्या संयुक्त वतीने शहरात भव्य आणि आक्रमक निषेध मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. “बाबासाहेबांचा अपमान नाही सहन करणार”, “लेखी जाहीर माफी द्या” अशा घोषणांनी संपूर्ण जामनेर दणाणून गेले. या मोर्चात अंदाजे ८०० ते ९०० नागरिक सहभागी झाले होते.
मोर्चानंतर जामनेर तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोलेख टाळला, ही बाब केवळ दुर्लक्ष नसून संविधानाचा व देशाच्या लोकशाही मूल्यांचा अपमान आहे.
निवेदनात आंदोलनकर्त्यांनी ठाम शब्दांत मागणी केली की, मंत्री गिरीश महाजन यांनी देशातील जनतेसमोर लेखी स्वरूपात जाहीर माफी मागावी. केवळ तोंडी स्पष्टीकरण स्वीकारले जाणार नसून लेखी माफी दिल्याशिवाय आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
याचबरोबर या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे. महाजन यांच्या भूमिकेविरोधात आवाज उठवणाऱ्या माधवी जाधव यांचे यावेळी जाहीर अभिनंदन करण्यात आले.
मोर्चादरम्यान विविध वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या नावाचा अपमान म्हणजे देशाच्या संविधानाचा अपमान आहे,” असे ठाम मत मांडले.
या निषेध मोर्चामुळे जामनेर शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता असून मंत्री गिरीश महाजन यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads