पाचोर्‍यात स्टॅम्प वेंडर ACB च्या जाळ्यात... - दैनिक शिवस्वराज्य

पाचोर्‍यात स्टॅम्प वेंडर ACB च्या जाळ्यात...

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
पाचोरा शहरात अधिकृत मुद्रांक विक्रेत्याकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम आकारण्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जळगाव यांनी नियोजनबद्ध सापळा रचून स्टॅम्प वेंडर आणि त्याच्या भावाला रंगेहात पकडत मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जामनेर–पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५०० रुपये दराचे १० स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले असता, तेथील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी यांनी शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम मागत प्रत्येक ५०० रुपयांच्या स्टॅम्पसाठी ५५० रुपये दर सांगितला. म्हणजेच १० स्टॅम्पसाठी ५,००० रुपये होत असताना ५,५०० रुपये देण्याची अट घालण्यात आली.
तक्रारदारांनी याबाबत विचारणा केली असता, “५५० रुपयेच लागतील, त्यात काही कमी होणार नाही,” असा ठाम पवित्रा योगेश संघवी यांनी घेतला. तसेच आधारकार्ड घेऊन येण्यास सांगितल्यामुळे तक्रारदार त्या दिवशी व्यवहार न करता परत गेले.दरम्यान, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून जास्तीची रक्कम उकळली जात असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदारांनी दि. १७ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली.
ACB पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता, योगेश ईश्वरलाल संघवी यांनी ५०० रुपये दराच्या १० स्टॅम्पसाठी ५,००० रुपये होत असताना अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी केल्याचे पंचासमक्ष स्पष्ट झाले. यामध्ये त्यांचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी हाही सक्रियपणे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.दि. १७ मार्च २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार स्टॅम्प खरेदीसाठी गेल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत प्रशांत ईश्वरलाल संघवी यांनी तक्रारदाराकडून ५०० रुपयांची अतिरिक्त रक्कम स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या ACB पथकाने तात्काळ धाड टाकत दोघांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी व पथक
या संपूर्ण कारवाईत खालील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली—
हेमंत नागरे – पोलीस निरीक्षक, सापळा अधिकारी, ACB जळगाव
योगेश ठाकूर – पोलीस उपअधीक्षक, ACB जळगाव (पर्यवेक्षण अधिकारी)
बाळु मराठे – सापळा पथक सदस्य
भूषण पाटील – सापळा पथक सदस्य
स्मिता नवघरे – पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी
या कारवाईस भारत तांगडे (पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र),माधव रेड्डी (अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र)आणि सुनील दोरगे (अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन लाभले.शासकीय दरापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्यांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन तक्रार केल्यास अशाच कठोर कारवाया करण्यात येतील, असा इशारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads