महाराष्ट्र
आहेरवाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग; बोरूटे कुटुंबाचा संसार जळून खाक.... एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची तात्काळ घटनास्थळी भेट....
समीर शेख, प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे मंगळवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत इरेश भागण्णा बोरूटे यांचे घर जळून खाक झाले. या आगीत सोने-चांदी, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणात राख झाल्याने बोरूटे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती पंचक्रोशीतील नागरिक तसेच परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी समाजसेवक व एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बोरूटे कुटुंबीयांची विचारपूस केली व त्यांना धीर देत मदतीचा हात पुढे केला.
यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर ओढवलेल्या संकटाच्या काळात समाजातील दानशूर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा. गेल्या अनेक वर्षांपासून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत सामाजिक कार्य सुरू असून पुढेही गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न कायम राहील.
समाज म्हणून आपण एकत्र उभे राहिलो तर कोणतेही संकट मोठे राहत नाही. त्यामुळे अशा गरजू कुटुंबांना आपल्या परीने शक्य तेवढे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा