संतप्त पहूरकरांचा वीज वितरण कंपनीवर एल्गार!विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांचा उद्रेक कार्यालयाला टाळे ठोकत अभियंत्यांना विचारला जाब - दैनिक शिवस्वराज्य

संतप्त पहूरकरांचा वीज वितरण कंपनीवर एल्गार!विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांचा उद्रेक कार्यालयाला टाळे ठोकत अभियंत्यांना विचारला जाब

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
पहूर ता. जामनेर :पहूर परिसरात सुरू असलेल्या सततच्या भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे अखेर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून आज संतप्त पहूरकरांनी थेट वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी कंपनीच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

सध्या पहूर आणि परिसरात विजेचे अतिरिक्त भारनियमन सुरू असून कोणतीही पूर्वसूचना न देता केव्हाही वीज गायब होत आहे. रात्रीच्या वेळी वीज नसते, तर दिवसा पथदिवे सुरू असल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

उन्हाच्या तीव्र झळा वाढत असताना लहान मुले, वृद्ध आणि महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शाळा आणि परीक्षांचा काळ असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत कार्यालयाला टाळे ठोकले आणि संबंधित अभियंत्यांना जाब विचारला. “वीज द्या नाहीतर आंदोलन तीव्र करू” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर अभियंत्यांनी नमते घेत पंधरा दिवसांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

या आंदोलनात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे, रामराव देशमुख , माजी सरपंच शंकर जाधव, राजधर पांढरे, तुषार बनकर, सुरेश घोंगडे, श्याम सावळे, लक्ष्मण गोरे, विशाल चौधरी, मधुकर बनकर, योगेश भडांगे, राजू जाधव, किशोर बनकर, वासुदेव घोंगडे,राजू पाटील , किरण पाटील,बाबुराव आस्कर बंडू पाटील, शैलेश पाटील, पुंडलिक भडांगे , ईश्वर घोंगडे, देवेंद्र घोंगडे, रोशन चौधरी, पुंडलिक घोंगडे , रवींद्र लाठे ,ईश्वर हिवाळे , रवींद्र घोलप , मनोज जोशी ,शरद पाटील ,विजय लहासे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोटींच्या योजना आणणाऱ्या विकास पुरुषाची अनुपस्थिती कशी ?

मंदिरांसाठी कोटीच्या कोटी योजना आणणारे विकास पुरुष या आंदोलनात कुठेही दिसले नाही .खरोखर सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत प्रश्नांविषयी या विकास पुरुषांना किती काळजी आहे यावरून दिसून आले .आंदोलनकर्त्यांमध्ये या विकास पुरुषांच्या स्वार्थी राजकारणाची चर्चाही खमंगपणे सुरू होती .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads