चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू; पहूरमध्ये हृदयद्रावक घटनाअंत्ययात्रेत मंगलाष्टके, आई-वडिलांचा हंबरडा - दैनिक शिवस्वराज्य

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू; पहूरमध्ये हृदयद्रावक घटनाअंत्ययात्रेत मंगलाष्टके, आई-वडिलांचा हंबरडा

चक्कर येऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू; पहूरमध्ये हृदयद्रावक घटना
अंत्ययात्रेत मंगलाष्टके, आई-वडिलांचा हंबरडा

तीन दिवसांपासून पेटतेय चिता

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

पहूर ता. जामनेर :
मंदिराच्या पायरीवर बसलेल्या तरुणाला अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पहूर येथे घडली.

पहूर कसबे येथील हनुमान मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसलेल्या हितेश अरुण पवार (वय १९) या तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनेनंतर त्याला तातडीने गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे आठ वाजेच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

मयत हितेश हा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. शालेय जीवनातच त्याला पियानो वादनाची विशेष आवड होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तो पियानोच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर करत असे. सध्या तो अजिंठा येथील बाबुरावजी काळे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

 *अंत्ययात्रेतच मंगलाष्टके;* उपस्थितांच्या डोळ्यात पाणी
हितेश हा एक हरहुन्नरी कलावंत होता. शिक्षणाबरोबरच तो वडिलांच्या मोहित बँड समूहात आपल्या कलेचे सादरीकरण करत होता. अंत्यसंस्कारावेळी सुपारीसोबत लग्न लावण्याची पारंपरिक प्रथा पार पडली. यावेळी पुरोहितांनी उच्चारलेल्या करुण मंगलाष्टकांनी वातावरण अधिकच भावुक झाले आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

सकाळी नऊ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 *अकाली एक्झिट; परिसरात शोककळा* 
नेहमीच मित्रपरिवारात रमणारा आणि वादनाचा छंद जपणारा हितेश याच्या अकाली निधनाने पहूर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ बहीण आजोबा मोठा असा परिवार आहे.

 सलग तिसऱ्या दिवशी स्मशानात पेटली चिता

गेल्या तीन दिवसांपासून पहुर येथे दररोज एक चिता पेटत असल्याने गाव शोक सागरात बुडाले आहे . विठ्ठल मंदिराचे चोपदार एक सेवाभावी व्यक्तिमत्व हरिभक्त परायण भागवत महाराज बाविस्कर यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार झाले . शनिवारी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आनंदा धनगर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले . आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशी हितेश पवार तरुणाला अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ धाम स्मशानभूमीत अलोट असा जनसागर उसळला होता . सलग तीन दिवसांपासून स्मशान धगधगत असल्याने पहूर गावात दुःखाचे सावट पसरले आहे .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads