महाराष्ट्र
भंडारकवठ्यात विद्यार्थ्यांना जागृतीचा संदेश; मोबाईल व्यसन व अंधश्रद्धेविरोधात डॉ. बालगांवकर यांचे प्रभावी मार्गदर्शन... विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश; भंडारकवठ्यात प्रेरणादायी व्याख्यान....
समीर शेख प्रतिनिधी
भंडारकवठे : भंडारकवठे येथील जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत गुरुवारी (दि. ९) अंधश्रद्धा निर्मूलन, मोबाईल व टीव्ही व्यसनाधीनता तसेच मानसिक ताण-तणाव या विषयांवर प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अस्मिता बालगांवकर यांचे व्याख्यान उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास सुमारे आठशे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव व मार्गदर्शक श्री. एम. डी. कमळे सर होते. गीतमंचच्या विद्यार्थिनींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संस्थापक शिक्षणमहर्षी कै. दी. शि. कमळे गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात पर्यवेक्षक जेऊरे सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले. तरवे मॅडम यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. यावेळी कमळे सर यांच्या हस्ते डॉ. बालगांवकर यांचा सत्कार करण्यात आला.
व्याख्यानात डॉ. बालगांवकर यांनी अंधश्रद्धांचे स्वरूप, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमधील वाढती मोबाईल व्यसनाधीनता व मानसिक ताण-तणाव यावरही त्यांनी उदाहरणांसह भाष्य केले. यावेळी त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विषयक पुस्तकांची भेट प्रशालेस दिली.
विज्ञानगीताने कार्यक्रमास सुरुवात होत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या शपथेने समारोप करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात कमळे सर यांनी विद्यार्थ्यांनी ताणमुक्त व सुदृढ मानसिकता विकसित करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेऊरे एस. एम. सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य मलकारी ए. एस. सर यांनी मानले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा