शेंडगे वस्तीचा रस्ता पुन्हा अडचणीत ; ठेकेदारांच्या वादात शेतकरी भरडले ठेकेदारांच्या वादामुळे कामाला स्थगिती ; “आम्हाला हक्काचा रस्ता द्या” शेतकऱ्यांची मागणी... - दैनिक शिवस्वराज्य

शेंडगे वस्तीचा रस्ता पुन्हा अडचणीत ; ठेकेदारांच्या वादात शेतकरी भरडले ठेकेदारांच्या वादामुळे कामाला स्थगिती ; “आम्हाला हक्काचा रस्ता द्या” शेतकऱ्यांची मागणी...


समीर शेख प्रतिनिधी 
मंद्रूप : अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेंडगे वस्तीच्या रस्त्याचे काम ठेकेदारांमधील वाद, स्थानिक राजकारण आणि प्रशासनाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून “राजकारण नको, आम्हाला रस्ता करून द्या,” अशी आर्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    जनसुविधा योजनेअंतर्गत लोकसेवा शाळेपासून शेंडगे वस्तीपर्यंतच्या रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या कामासाठी भुरीकवठे येथील आशीर्वाद मजूर संस्था आणि माळकवठे येथील अमोगसिद्ध मजूर संस्था यांच्यात चुरस होती. अखेर ६ एप्रिल रोजी अमोगसिद्ध मजूर संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला आणि कामालाही सुरुवात झाली.
     मात्र, दुसऱ्या संस्थेकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पंचायत समिती दक्षिणचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सुनावणी घेतली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी दोन्ही ठेकेदारांतील वाद मिटेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
     दरम्यान, कार्यारंभ आदेशानुसार सहा महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असताना सुरुवातीलाच महिनाभर काम ठप्प राहिल्याने पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुदतवाढ मिळणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
    दक्षिण पंचायत समितीअंतर्गत अनेक निकृष्ट कामांच्या तक्रारी प्रलंबित असताना त्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रस्त्यालाच स्थगिती देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
     “दोन्ही ठेकेदारांनी आपापसातील वाद मिटवून घेतल्यानंतरच काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा २० लाख रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता आहे,” अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
    “पावसाळा तोंडावर आला आहे. रस्ता रखडल्यास शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. प्रशासनाने राजकारण बाजूला ठेवून तातडीने काम सुरू करावे,” अशी मागणी शेतकरी रेवणसिद्ध शिंगडगाव यांनी केली.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads