जामनेरात पंचायत समितीत ACBचा मोठा सापळा; तांत्रिक सहाय्यक ताब्यात विहीर अनुदानाच्या उर्वरित रकमेसाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी; दुपारी ४ वाजता पंचायत समिती कार्यालयात धडक कारवाई
जामनेर पंचायत समितीमध्ये सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या सापळ्यात तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) सागर नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. शासनाच्या विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पुढील अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास जामनेर पंचायत समिती कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.माहितीनुसार, तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून सन २०२१, २०२२ व २०२३ या कालावधीत पंचायत समिती जामनेरमार्फत शासनाच्या योजनेअंतर्गत विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. प्रस्तावित विहिरीच्या स्थळाची पाहणी करण्यापूर्वी सागर नावकर यांनी गावातील रोजगार सेवकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी संबंधित जागेची पाहणी करून छायाचित्रे घेतली होती.
दरम्यान, पंचायत समितीमार्फत तक्रारदारास वेळोवेळी एकूण ६० हजार ९६६ रुपये इतकी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली. मात्र उर्वरित अनुदान मिळण्यासाठी तक्रारदारांनी सागर नावकर यांची भेट घेतली असता, विहिरीचे ठिकाण बदलले असल्याचे कारण देत पुढील अनुदान मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच उर्वरित अनुदानाची रक्कम मिळवून हवी असल्यास ३० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रारदारांनी ६ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACBच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली. पडताळणीदरम्यान सागर नावकर यांनी शासनाच्या विहीर योजनेअंतर्गत मंजूर कामासाठी पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर ACBने नियोजनपूर्वक सापळा रचला. सोमवारी दुपारी जामनेर पंचायत समिती कार्यालयात कारवाई करण्यात आली आणि सुमारे ४ वाजेच्या सुमारास सागर नावकर यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच पंचायत समिती परिसरात नागरिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गर्दी झाली होती.
सागर नावकर यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि भूषण पाटील यांनी सहभाग घेतला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव हे करीत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा