जामनेरात वाकी बु. ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांविरोधात अमोल सुरवाडे यांचे उपोषण
जामनेर तालुक्यातील वाकी बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, माहिती अधिकाराचा अवमान व विकासकामांतील अनियमिततेविरोधात ग्रामस्थ अमोल सुरवाडे यांनी उपोषण सुरू केले आहे. पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यापूर्वी दि. 13 मे 2026 रोजी पंचायत समिती गेटसमोर बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला वारंवार निवेदने, तक्रारी व माहिती अधिकार अर्ज देण्यात आले. मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने दि. 30 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
अमोल सुरवाडे यांनी सांगितले की, हे आंदोलन गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी असून ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
उपोषणातील प्रमुख मागण्यांमध्ये समाजमंदिर रंगकाम खर्चाची चौकशी, व्यायामशाळेसाठी दाखवलेल्या खर्चाची पडताळणी, माहिती अधिकारात अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, अपुरा पाणीपुरवठा, कथित बनावट सह्या, सौर पॅनल व बॅटरी चोरी प्रकरण, ग्रामसभा न घेणे, दलित वस्तीतील कामांतील कथित गैरव्यवहार आणि विविध विकासकामांच्या चौकशीचा समावेश आहे.
तसेच सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, उपोषण सुरू असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अमोल सुरवाडे यांनी दिला आहे. आता पंचायत समिती प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन चौकशी करणार की दुर्लक्षाची भूमिका कायम ठेवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा