केकतनिंभोरेकरांचा ऐतिहासिक विजय: पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिरावर बुलडोझर फिरणार नाही; पुरातत्व विभागाची मंदिरे पाडकामाला स्थगिती. - दैनिक शिवस्वराज्य

केकतनिंभोरेकरांचा ऐतिहासिक विजय: पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिरावर बुलडोझर फिरणार नाही; पुरातत्व विभागाची मंदिरे पाडकामाला स्थगिती.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरे येथील अंदाजे ४०० ते ४५० वर्षे जुन्या पुरातन विठ्ठल-रखुमाई आणि लक्ष्मी-नारायण मंदिरांवर आलेले पाडकामाचे संकट टळले आहे. पुरातत्व विभागाने या मंदिरांच्या संवर्धनाचे आदेश देत रस्ता रुंदीकरणाच्या कामात ही मंदिरे न पाडता पर्यायी मार्ग काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​नेमके प्रकरण काय?
​वावडदा-नेरी-जामनेर रस्ता रुंदीकरण आणि काँग्रेटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामात केकतनिंभोरे येथील रोडालगत असलेली ही ऐतिहासिक मंदिरे अडथळा ठरत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीमार्फत रस्ता कामासाठी मंदिर पाडण्याचा ठराव संमत करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील आणि ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच याला तीव्र विरोध दर्शवला होता.
​कायदेशीर लढा आणि पुरातत्व विभागाची भूमिका
​ग्रामसभेत काही लोकांचा विरोध असतानाही ठराव संमत करण्यात आला होता. यानंतर अशोक पाटील यांनी हार न मानता या प्रकरणी तातडीने धाव घेतली. त्यांनी पुरातत्व विभाग (मुंबई, पुणे, नाशिक) यांच्याकडे पत्रव्यवहार करून मंदिरांचे ऐतिहासिक पुरावे, ७/१२ उतारे आणि कागदपत्रे सादर केली. यावर गांभीर्याने दखल घेत पुरातत्व विभागाने तातडीने जामनेर तहसीलदार आणि ग्रामपंचायतीला मंदिरे न पाडण्याचे निर्देश दिले. विभागाच्या १९८२ च्या परिपत्रकाचा संदर्भ देत, ऐतिहासिक वास्तूंना इजा न पोहोचवता रस्ता कामासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.​विकासाला विरोध नाही, पण श्रद्धेशी तडजोड नाही
​याबाबत बोलताना मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील म्हणाले की, "आम्ही रस्ता विकासाच्या विरोधात नाही. रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडे काढण्यासही आम्ही संमती दिली आहे. परंतु, आमची श्रद्धा असलेली ही पुरातन मंदिरे वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा दिला आणि त्यात आम्हाला यश आले आहे."
​पुरातत्व विभागाच्या या निर्णयामुळे गावाची ओळख असलेली ही पुरातन मंदिरे सुरक्षित राहणार असून, प्रशासनाला आता रस्ता कामासाठी वेगळा मार्ग शोधावा लागणार आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads