जामनेर तालुक्यातील गोद्रीतांडा हादरला! आदिवासी विवाहितेवर सामूहिक अत्याचार; गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने फत्तेपूर पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील गोद्रीतांडा हादरला! आदिवासी विवाहितेवर सामूहिक अत्याचार; गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने फत्तेपूर पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
फत्तेपूर (ता. जामनेर) : फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोद्रीतांडा शिवारात एका आदिवासी विवाहितेवर झालेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या गंभीर घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या दोन घटना समोर आल्याने आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गोद्रीतांडा येथील रामेश्वर गणपत राठोड याने पोह्यांमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला आपल्या घरात नेले. त्यानंतर त्याच्यासह सूरज भिमसिंग राठोड, पवन छगन राठोड आणि धारमल कृपाल साबळे यांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, काही दिवसांनी पीडित महिला शेतातून घरी परतत असताना आरोपी रामेश्वर राठोड याने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून साथीदारांच्या मदतीने सोमसिंग मास्तर यांच्या शेताजवळील पाटाच्या नाल्यावर नेले. तेथे तिला दोरीने बांधून बंदुकीचा धाक दाखवत चौघांनी सामूहिक अत्याचार केला. तसेच अन्य तीन ते चार संशयितांनी या घटनेचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित महिला १५ जुलै रोजी आपल्या पतीसह फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. मात्र, तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत तिच्या पतीने संतापाच्या भरात हातात पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही महिलेने सांगितले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे आदिवासी समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आणखी तीन ते चार संशयितांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads