बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी भाजप नेते संजय गरुड ताब्यात; जामनेरच्या राजकीय व शैक्षणिक वर्तुळात खळबळ - दैनिक शिवस्वराज्य

बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी भाजप नेते संजय गरुड ताब्यात; जामनेरच्या राजकीय व शैक्षणिक वर्तुळात खळबळ

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक व भाजप नेते संजय गरुड यांना विशेष तपास पथकाने (SIT) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या विशेष तपास पथकाने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून ही कारवाई केली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पथक त्यांच्या शोधात असल्याचेही सांगितले जात आहे.तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, अल्पावधीतच सुमारे १७७ कथित बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची न्यायालयीन पडताळणी होणे अद्याप बाकी आहे.
जामनेर तालुक्याला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. अशा तालुक्यातून इतक्या मोठ्या स्वरूपाचे कथित शालार्थ आयडी प्रकरण समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात तसेच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी काही शिक्षण संस्थांचे पदाधिकारी आणि संस्थाचालक तपास यंत्रणांच्या रडारवर असून, पुढील काळात आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीयदृष्ट्याही चर्चेचा विषय
संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील परिचित राजकीय व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून मंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
या कारवाईमुळे जामनेरच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणात पुढे तपासातून कोणती माहिती समोर येते आणि कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads