महाराष्ट्र
सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी पत्रकार अशोक सोनकंटले यांचा जनता संघर्ष न्यूजकडून सन्मान...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : जनता संघर्ष न्यूज आयोजित "इयत्ता दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार व समाजोपयोगी संस्था-संघटनांचा सन्मान सोहळा-२०२६" हा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. शिक्षणाला प्रोत्साहन देतानाच समाजसेवक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
यावेळी सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक राजस्वचे दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी अशोक सोनकंटले तसेच एम.जे. प्रथम मानव सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन तलकोकुल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती असलेले विशेष पेन प्रदान करून गौरविण्यात आले.
या सोहळ्यास पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्राचार्य डॉ. नसीमा पठाण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे आणि गिरजा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शुभांगी दर्गोपाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सिद्धार्थ भडकुंबे आणि लक्ष्मी नागणसुरे यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल, फेटा, गुलाबपुष्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचे विशेष पेन देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून जनता संघर्ष न्यूजच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सारा न्यूजचे संपादक डॉ. राम हुंडारे, पत्रकार निलेश डांगे, अमोल कुलकर्णी, नागेश पासकंटी, विजयकुमार जुंजा, गिरमल्ला गुरव, संतोष धोत्रे, सिताराम गायकवाड तसेच सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोक सोनकंटले यांचे वर्गमित्र अल्ताफ नदाफ आणि अप्पासाहेब ऐवळे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षण, समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या जनता संघर्ष न्यूजच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, हा कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले, तर श्रीकांत हाले यांनी आभार प्रदर्शन केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा