अखेर मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी करणाऱ्या आरोपीला अटक...
महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी व बदनामीकारक पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीला जळगाव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवून बदनामी करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा मिळाला आहे.
या प्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, १९ जून २०२६ रोजी मध्यरात्री मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी व बदनामीकारक पोस्ट प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा हा गंभीर प्रकार लक्षात येताच त्यांनी कोणताही विलंब न करता दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.तक्रारीची जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सखोल व तांत्रिक तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली जळगाव सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे कसून तपास करत आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान भरत बाळाजी म्हस्के (वय ३४), रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे याला अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून तपास अंतिम टप्प्यात आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे विशेष आभार मानत जळगाव सायबर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, तक्रारीची तात्काळ दखल घेऊन निष्पक्ष, वेगवान आणि परिणामकारक तपास करून आरोपीपर्यंत पोहोचण्याची कार्यक्षमता जळगाव पोलिसांनी सिद्ध केली आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे, तांत्रिक कौशल्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे नागरिकांचा सायबर पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा