धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत.... पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पादुका पूजन; जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी - दैनिक शिवस्वराज्य

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे भक्तिमय स्वागत.... पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पादुका पूजन; जिल्हा प्रशासनाकडून पालखी रथावर पुष्पवृष्टी


समीर शेख प्रतिनिधी 
पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पादुकांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा माऊली-तुकाराम" तसेच "राम कृष्ण हरी"च्या जयघोषात पालखीचे धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही अंतर पालखीसोबत पायी चालत वारकऱ्यांच्या भक्तीभावात सहभाग नोंदविला. पोलीस बँड पथकाने भक्तिमय धून सादर करून स्वागत सोहळ्याला विशेष रंगत आणली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. भावार्थ देखणे महाराज यांचाही सत्कार करण्यात आला.
      याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील अधिकारी, पदाधिकारी आणि हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.
प्रशासनाची चोख व्यवस्था....
पालखी स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत विशेष नियोजन केले होते. आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आला होता. भाविकांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फूट मसाज मशीनची व्यवस्था करण्यात आली असून हजारो वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. तसेच आरोग्यदूत आणि आरोग्य बाईकद्वारे तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads