अखेर तिढा सुटला... गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी - दैनिक शिवस्वराज्य

अखेर तिढा सुटला... गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सोमवारी, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सुटला. राज्य शासनाने नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. तर रायगडची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही काळापासून चर्चा आणि राजकीय रस्सीखेच सुरू होती. अखेर गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांच्या नियोजनात पालकमंत्री म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पांडुरंग पावला— महाजनांची पहिली प्रतिक्रिया
पालकमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूर येथे दर्शन घेत असताना पत्नीने आपल्याला पालकमंत्री झाल्याची बातमी दिल्याचे त्यांनी सांगितले. “पांडुरंग पावला,” अशी प्रतिक्रिया देत नाशिकचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा भव्य स्वरूपात पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला.

नाशिकच्या विकासाला मिळणार नवी दिशा?
गिरीश महाजन यांच्याकडे आता नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांच्या समन्वयाची जबाबदारी आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, नाशिकच्या विकासकामांना आणि प्रशासकीय नियोजनाला आता वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नाशिकची धुरा गिरीश महाजनांकडे; आता सिंहस्थ कुंभमेळा आणि विकासकामांना किती वेग मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads