नबीदाजी गेले… समाज पोरका झाला! परिवर्तनवादी झंकार हरपला; विंचूरच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी
आज रविवारी सकाळी विंचूरचे ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव साबळे यांचा फोन आला. ते म्हणाले, “काय समजलं का?” मी म्हटलं, “नाही नाना.” त्यावर ते म्हणाले, “आपले नबीदाजी गेले…”
हा शब्द कानी पडताच मन सुन्न झाले. माझे आजोबा संभाजी साबळे यांचे १७ जून रोजी निधन झाले. त्यावेळी आजारी असतानाही नबीदाजी अंत्यसंस्कारासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी आबा गुरुजींनी सांगितले होते की, दाजींना दवाखान्यात दाखल केले आहे. त्यांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा कॉटवर झोपलेले असतानाही मला पाहून ते म्हणाले, “माझा संभा गेला… आता समाजात कोणी मोठा माणूस राहिला नाही.” हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यावेळी मी त्यांना धीर देत म्हणालो, “आधी तुम्ही बरे व्हा… तुम्हीच आता समाजातील मोठे आहात.”
*पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते.*
नबीदाजी म्हटलं की, विंचूर गावातील तसेच दलित समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. समाजाचे कोणतेही काम असो, कोणाच्या सुख-दुःखाची घटना असो, नबीदाजी त्यात आवर्जून सहभागी होत. समाजाच्या प्रश्नांसाठी पुढे येणारा, कार्यकर्त्यांना दिशा देणारा आणि परिवर्तनाची मशाल तेवत ठेवणारा एक मोठा आधार आज हरपला आहे. नबीदाजींच्या जाण्याने जणू संपूर्ण समाजच पोरका झाला आहे.
*अंधश्रद्धेविरोधात परिवर्तनाची मशाल*
१९८८-८९ चा तो काळ आजही आठवतो. नबीदाजींनी समाजातील तरुणांना सोबत घेऊन अंधश्रद्धेविरोधात आवाज उठविला. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढत परिवर्तनाचा मार्ग दाखविण्याचे काम त्यांनी केले.
त्याच काळात दलित पॅंथर ही संघटना तरुणांमध्ये परिवर्तनवादी विचारांची क्रांती घडविण्याचे काम करीत होती. विंचूर गावात या चळवळीची शाखा नबीदाजींच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठविताना त्यांनी अनेक तरुणांना चळवळीशी जोडले.
विंचूर गावात दोन समाजांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वेळी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले विंचूर येथे आले होते. त्यांना विंचूरमध्ये आणण्यासाठी नबीदाजींसह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सामाजिक सलोखा आणि न्यायासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही स्मरणात राहतील.
*परिवर्तनवादी ‘झंकार’ हरपला*
विंचूरची जयबौद्ध झंकार गायन पार्टी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होती. या गायन पार्टीचे संस्थापक नबीदाजी साबळे होते. बब्रुवान साबळे, अभिमन्यू आठवले, तुकाराम शिवाजी साबळे, नारायण साबळे, तुकाराम साबळे, दगडू साबळे, अतुल साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यांच्या साथीला होते.
भीमगीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि परिवर्तनाचे कार्य या गायन पार्टीने केले. वैरागचे भालशंकर गुरुजी, हिरजचे बाळशिवबा गुरुजी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कलाकारांसोबत नबीदाजींनी भीमगीतांचे कार्यक्रम केले.
या गीतांमधून केवळ मनोरंजन नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला जात होता. विंचूरच्या दलित समाजाला परिवर्तनवादी विचारांची दिशा देण्याचे मोठे कार्य नबीदाजींनी केले.
*कुटुंबवत्सल दाजी*
नबीदाजी साबळे हे सामाजिक कार्यकर्ते होतेच; मात्र त्याचबरोबर ते अत्यंत कुटुंबवत्सल आणि हळव्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते. परिस्थिती गरिबीची असतानाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले.
त्यांची मुले आबा साबळे गुरुजी आणि विष्णू साबळे हे आज शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तेही समाजप्रबोधन आणि परिवर्तनाचे कार्य करीत आहेत. मुलांच्या तसेच मुलींच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आपल्या कुटुंबात रुजविले.
समाजासाठी झटताना आपल्या कुटुंबालाही शिक्षित आणि सक्षम करण्याचा आदर्श नबीदाजींनी घालून दिला.
नबीदाजी साबळे यांचे निधन ही केवळ एका व्यक्तीची हानी नाही; तर विंचूरच्या सामाजिक, परिवर्तनवादी आणि आंबेडकरी चळवळीतील एक धगधगता अध्याय संपल्यासारखे आहे. त्यांच्या विचारांची ज्योत आणि त्यांनी घडविलेली परिवर्तनाची वाटचाल पुढील पिढ्यांना निश्चितच प्रेरणा देत राहील.
आपल्या दलित समाजाची अस्मिता जपणाऱ्या, विद्रोही, परिवर्तनवादी आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्वाला लांडगे परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली!
— अमोगसिद्ध लांडगे
पत्रकार, दिव्य मराठी, विंचूर
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा