मंडळाच्या हिशोबावरून झालेला वाद ठरला जीवघेणा... तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.... - दैनिक शिवस्वराज्य

मंडळाच्या हिशोबावरून झालेला वाद ठरला जीवघेणा... तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात मंडळाच्या मागील वर्षाच्या आर्थिक हिशोबावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला आता दुर्दैवी वळण मिळाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किशोर सुरेश बाविस्कर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर बाविस्कर याचा मंडळाच्या मागील वर्षाच्या आर्थिक हिशोबावरून काही जणांसोबत वाद सुरू होता. २ सप्टेंबर रोजी दुर्गादेवीच्या मूर्तीच्या बुकिंगसंदर्भात मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर जुन्या आर्थिक हिशोबाच्या कारणावरून पुन्हा वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीनुसार, वाद वाढल्यानंतर किशोरवर चाकूने पोटावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जामनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलविण्यात आले.
मात्र, जळगाव येथे उपचार सुरू असतानाच किशोरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी समोर येताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेदरम्यान किशोरला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी किशोरच्या आईने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे निलेश प्रभाकर नानोटे आणि योगेश प्रभाकर नानोटे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.तरुणाच्या मृत्यूनंतर जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने सुरू असून, घटनेमागील नेमका वाद, हल्ल्याची परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका याबाबत तपास केला जात आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads