महाराष्ट्र
मंद्रूप पोलिसांचा न्यायालयीन पाठपुरावा ; आरोपीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : जबरदस्तीने पैसे काढून घेणे, अवैध व्याजाच्या पैशासाठी दमदाटी करणे आणि फिर्यादीला त्रास दिल्याच्या प्रकरणात मंद्रूप पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
या प्रकरणात मनगोळी येथील मल्लीनाथ सुरेश पाटील यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांनी गावातील सागर अनिल जाधव (वय ३३) याच्याकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. ही रक्कम सहा महिन्यांत परत केल्यानंतरही आरोपीकडून आणखी दुप्पट रकमेची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी आरोपीने पाटील यांना आपल्या घरी बोलावून घेतले. ते मित्रासह आरोपीच्या घरी गेले असता पैशांच्या व्यवहारावरून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. यावेळी झालेल्या झटापटीत पाटील यांच्या खिशातील ४ हजार ८०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. तसेच शर्टाचा खिसा फाटला असून वाहनाची चावीही काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी सागर जाधव याला २९ ऑगस्ट रोजी रात्री अटक केली. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गुन्ह्यातील रक्कम व वाहनाचा शोध घेण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे यांनी केली होती. मात्र, प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
यानंतर तपासाच्या दृष्टीने आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याने तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि सरकारी अभियोक्ता पी. जे. गवळी यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अधिवक्ता कविता बागल यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्यातील मुद्देमालाची रिकव्हरी आणि पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी आरोपी सागर जाधव याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक अमित करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम आदलिंग, पोलीस कॉन्स्टेबल लखन पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा काळे आणि विद्या कांबळे यांनी तपासात सहभाग घेतला.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा