जामनेरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता निवृत्ती बो-हाडेंच्या हाती!नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे पत्रकार नितीन इंगळे, अविनाश सपकाळे व देविदास विसपुते अतुल मेढे यांनी केले स्वागत - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा आता निवृत्ती बो-हाडेंच्या हाती!नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे पत्रकार नितीन इंगळे, अविनाश सपकाळे व देविदास विसपुते अतुल मेढे यांनी केले स्वागत

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर शहर व तालुक्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आता अनुभवी पोलीस अधिकारी निवृत्ती भिमराव बो-हाडे यांच्या खांद्यावर आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील अलीकडील फेरबदलात त्यांची जामनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ६ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांनी जळगाव जिल्ह्यात हजर होऊन जामनेरची जबाबदारी स्वीकारली आहे.

निवृत्ती बो-हाडे यांना पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेचा अनुभव असून, यापूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. माणगाव परिसरातील विविध गुन्हेगारी घटना, गंभीर प्रकरणे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रसंगी पोलिसांच्या कारवाईत त्यांचा अधिकारी म्हणून उल्लेख झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याची जामनेरमध्ये नियुक्ती झाल्याने पोलिसांच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

जामनेर तालुक्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवणे, गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तत्परतेने निराकरण करणे, ही नव्या पोलीस निरीक्षकांसमोरील महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. विशेषतः नागरिकांशी संवाद वाढवून पोलिसांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावरही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, जामनेर शहरातील पत्रकार नितीन इंगळे, अविनाश सपकाळे आणि देविदास विसपुते यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांचे स्वागत करून नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच नवीन उपपोलिस निरीक्षक पदाची जबाबदारी डोंगरसिंग नाईक यांच्याकडे आल्या नंतर त्यांना शुभेच्छा दिल्या.शहर व तालुक्यातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयातून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचविण्यास मदत होते. त्यामुळे सकारात्मक पत्रकारिता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी परस्पर सहकार्याची भावना या भेटीतून व्यक्त झाली.

रायगडच्या अनुभवाची शिदोरी घेऊन निवृत्ती बो-हाडे यांनी जामनेरची सूत्रे हाती घेतली असून, त्यांच्या कार्यकाळात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, गुन्हेगारीला आळा बसेल आणि सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून तत्पर सेवा मिळेल, अशी अपेक्षा जामनेरकरांकडून व्यक्त होत आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads