दक्षिण सोलापूरला लवकरच नव्या एसटी बसेस ; परिवहनमंत्री सरनाईकांचे आश्वासन... - दैनिक शिवस्वराज्य

दक्षिण सोलापूरला लवकरच नव्या एसटी बसेस ; परिवहनमंत्री सरनाईकांचे आश्वासन...



समीर शेख प्रतिनिधी 
मंद्रूप, दि. २३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, कुडल तसेच सीना-भीमा खोऱ्यातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच नवीन एसटी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मार्गांवर नवीन एसटी बस सोडण्याच्या मागणीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील आणि दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांनी परिवहनमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी सरनाईक बोलत होते.
     मंद्रूप, भंडारकवठे, औज, कंदलगाव, औराद, हत्तरसंग आदी मार्गांवर जुन्या व मोडकळीस आलेल्या बस धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पंचाक्षरी स्वामी यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले. बसची अनियमित वेळ, तांत्रिक बिघाड, खराब आसने, फुटलेल्या काचा व अस्वच्छता यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. सकाळच्या बस दुपारी, तर दुपारच्या बस सायंकाळी धावत असल्याने विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
     विशेषतः परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या भागासाठी नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
     यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना याबाबत सूचना देण्यात येतील. दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याबरोबरच मंद्रूप-भंडारकवठे-कंदलगाव-कुडलसह सीना-भीमा खोऱ्यात लवकरच नवीन एसटी बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads