कुरुल येथील वीटभट्टीवरील धक्कादायक घटना ; पत्नीवर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू ; पतीविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल... - दैनिक शिवस्वराज्य

कुरुल येथील वीटभट्टीवरील धक्कादायक घटना ; पत्नीवर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू ; पतीविरुद्ध कामती पोलिसांत गुन्हा दाखल...


समीर शेख प्रतिनिधी 
मोहोळ (कामती) : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर विटेने आणि ऊसतोडणीच्या कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कुरुल (ता. मोहोळ) परिसरात शनिवारी (दि. २६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
      गायत्री यशवंत हेगडे (वय २३, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या कुरुल, ता. मोहोळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रेखा बालाजी हेगडे (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत उर्फ आबू भारत हेगडे (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या कुरुल) याच्याविरुद्ध कामती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील बिरू मोटे यांच्या वीटभट्टीवर गायत्री व तिचे पती राहत होते. दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गायत्री हिने पतीला दारू पिल्यास आपण आईकडे जाणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
     त्यानंतर आरोपीने विटेने तसेच ऊसतोडणीच्या कोयत्याने गायत्रीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व डाव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जकिकोरे हे करीत असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads