जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला अत्याधुनिक ३०० एम.ए. एक्स-रे यंत्राची भेट!गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा; आता स्थानिक पातळीवरच मिळणार अद्ययावत क्ष-किरण तपासणीची सुविधा - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला अत्याधुनिक ३०० एम.ए. एक्स-रे यंत्राची भेट!गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा; आता स्थानिक पातळीवरच मिळणार अद्ययावत क्ष-किरण तपासणीची सुविधा

जामनेर उपजिल्हा रुग्णालयाला अत्याधुनिक ३०० एम.ए. एक्स-रे यंत्राची भेट!

गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा; आता स्थानिक पातळीवरच मिळणार अद्ययावत क्ष-किरण तपासणीची सुविधा

जामनेर : जामनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे अत्याधुनिक ३०० एम.ए. (300 mA) क्ष-किरण (X-Ray) यंत्र दाखल झाले आहे. त्यामुळे परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना आता क्ष-किरण तपासणीसाठी इतर शहरांमध्ये किंवा खासगी केंद्रांवर जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे नवीन एक्स-रे यंत्र चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे यशस्वीरीत्या हस्तांतरित करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, NQAS नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर तसेच डॉ. दीपक जाधव यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, यंत्राच्या मंजुरीपासून हस्तांतरणापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. राहुल कोडवते तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण परिवाराचेही या महत्त्वपूर्ण सुविधेसाठी अभिनंदन होत आहे.

रुग्णांना होणार मोठा फायदा

नवीन ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्रामुळे रुग्णांना जलद व अचूक क्ष-किरण तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तपासणीसाठी होणारा वेळ, प्रवासाचा खर्च आणि खासगी रुग्णालयांवरील आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा आहे.

लोकार्पण सोहळा लवकरच!

सदर क्ष-किरण यंत्र अधिकृत अभियंत्यांमार्फत योग्य पद्धतीने इन्स्टॉल व कार्यान्वित झाल्यानंतर, जामनेरचे आमदार तथा राज्याचे मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या सुविधेचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय परिवाराकडून देण्यात आली आहे.

जामनेरच्या आरोग्य सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads