जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भक्तिमय जल्लोष!इस्कॉन भुसावळ व इस्कॉन जामनेरचा संयुक्त महोत्सव; दोन हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त इस्कॉन भुसावळ व इस्कॉन जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी बाबाजी राघव मंगल कार्यालय, जामनेर येथे भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत रंगलेल्या या भक्तिमय सोहळ्यास दोन हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेतला.
या मंगल सोहळ्यास सौ. साधना ताई गिरीशभाऊ महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. इस्कॉन जामनेरच्या वतीने त्यांचा श्रीश्री राधा मुरलीधर यांची सुंदर फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भुसावळ येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
भव्य अभिषेक सोहळ्याने वातावरण झाले कृष्णमय
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते श्रीश्री राधा मुरली मनोहर यांच्या भव्य अभिषेक सोहळ्याचे. विविध नैसर्गिक फळे, पुष्पे व पवित्र द्रव्यांसह तब्बल २५ नैसर्गिक घटकांनी अभिषेक करण्यात आला. भक्तांच्या श्रद्धा, प्रेम आणि सेवाभावामुळे संपूर्ण परिसर कृष्णभक्तीने भारावून गेला.
हरिनाम संकीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
इस्कॉन भुसावळच्या युवा भक्तांची हरिनाम संकीर्तन पार्टी महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “हरे कृष्ण, हरे कृष्ण…” या महामंत्राच्या जयघोषात भाविक भक्तिरसात तल्लीन झाले.
मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतानाही इस्कॉन भुसावळच्या युवा भक्तांनी सुरक्षा व व्यवस्थापनाची जबाबदारी शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
१५६ प्रकारच्या भोगांचा श्रीकृष्णाला नैवेद्य
श्रीश्री राधा युगल किशोरजींची मनोहारी सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भक्तांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या तब्बल १५६ प्रकारच्या भोगांचा श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे सुंदर दर्शन घडले.
चिमुकल्या भक्तांनी साकारली राधा-कृष्ण लीला
इस्कॉन गोपाल फन स्कूलच्या बालभक्तांनी सादर केलेली राधा-कृष्ण लीला व गीतांचे सुंदर सादरीकरण उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. चिमुकल्या भक्तांच्या निरागस अभिनयाने आणि सादरीकरणाने संपूर्ण वातावरणात बालकृष्णाच्या लीलांचा आनंद अनुभवायला मिळाला.
महाप्रसादाचा भाविकांनी घेतला आस्वाद
कार्यक्रमानंतर भाविकांसाठी स्वादिष्ट महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जामनेर शहरासह परिसरातील विविध गावांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहाने महोत्सवात सहभाग घेतला.
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, भक्ती, धर्म आणि मानवतेचा संदेश देणारा मंगल सोहळा आहे. जामनेरमध्ये झालेल्या या भव्य महोत्सवातून उपस्थित भाविकांना जणू “वृंदावनाची अनुभूती जामनेरमध्ये” मिळाली.
इस्कॉन भुसावळ व इस्कॉन जामनेर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेल्या या भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाने जामनेर परिसरात भक्ती, संस्कृती आणि हरिनाम संकीर्तनाचा दिव्य संदेश पोहोचविला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा