ग्रामसखींच्या विविध मागण्यांसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी २०० ते ३०० महिलांची भेट₹२० हजार मानधनासह कायमस्वरूपी नियुक्ती, विमा, प्रवास भत्ता व टॅबची मागणी
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत ग्रामसखींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळी १० वाजता जामनेर येथे मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी सुमारे २०० ते ३०० महिलांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी ग्रामसखींच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून त्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामसखींच्या प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामसखींना उमेद अभियानात कायमस्वरूपी करण्यात यावे, ग्रामसखींचे मानधन वाढवून मासिक ₹२० हजार करण्यात यावे, मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, ऑनलाइन कामासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात यावा तसेच ऑनलाइन कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यासोबतच राज्य शासनाकडून मिळणारे थकीत मानधन वेळेत अदा करण्यात यावे, तालुकास्तरीय बैठकीसाठी येण्या-जाण्याचा प्रवास भत्ता देण्यात यावा आणि ग्रामसखींना विमा संरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मंत्री गिरीश महाजन तसेच साधना ताई यांची भेट घेऊन ग्रामसखींच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याने ग्रामसखींच्या मागण्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे यावेळी दिसून आले.
यावेळी जामनेर तालुका केडर संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील, सचिव पूनम पाटील, कोषाध्यक्षा सुनीता चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामसखी ताई उपस्थित होत्या.
ग्रामसखींच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा