विद्युत तारेच्या शॉकने बिबट मादीचा मृत्यू – वन विभागाकडून तपास सुरू - दैनिक शिवस्वराज्य

विद्युत तारेच्या शॉकने बिबट मादीचा मृत्यू – वन विभागाकडून तपास सुरू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारातील गट नंबर 82 येथे एक वन्यप्राणी बिबट मादी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी भारुडखेडा-तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासारे यांच्या शेतात हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळताच वनक्षेत्रपाल जामनेर, वनपाल गोदरी, वनरक्षक गोदरी, वनरक्षक पठाड, आणि वनरक्षक पिंपळगाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी सखोल तपासणी केल्यानंतर हे ठिकाण वनक्षेत्रापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असल्याचे आढळून आले.

मृत बिबट मादीचे शव वनपरिक्षेत्र कार्यालय, जामनेर येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी श्री. संजय खाचणे आणि इतर दोन अधिकाऱ्यांच्या चमूने शवविच्छेदन केले. मानद वन्यजीव रक्षक श्री. रवींद्र फालक आणि वनाधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली.

प्राथमिक तपासणीत मृत बिबट मादी अंदाजे तीन वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावरील सर्व अवयव शाबूत आढळले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, तिचा मृत्यू विद्युत तारेच्या शॉकने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तपासणीसाठी बिबट मादीच्या शरीराचे विविध अवयव न्यायवैद्यक तपासणीसाठी सीलबंद करून पाठवण्यात आले आहेत. पुढील अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

मृत बिबट मादीस मा. सहायक वनसंरक्षक जळगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी जामनेर, मानद वन्यजीव रक्षक श्री. रवींद्र फालक, वनपाल गोदरी, वनपाल जामनेर, वनपाल फत्तेपूर, आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात अग्निदाह देण्यात आला.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वन विभाग, जळगाव यांच्यामार्फत सुरू आहे.

वन विभागाने जनतेस आवाहन केले आहे की, परिसरात कोणत्याही वन्यप्राण्याचा वावर आढळल्यास त्वरित जवळच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads