विधानसभा अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू
महाविकास आघाडीत विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी किंवा बुधवारी ही निवड प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता असून तिन्ही पक्षांना अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आपआपले आमदार हजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. मात्र, थोपटे यांना काँग्रेसकडून संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवड झाल्याने नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अधिवेशनात हे पद रिक्त असून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सध्या कामकाज चालवित आहेत. भाजपने गुरुवारी विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता अजित पवार यांनी मध्य प्रदेशमध्ये हे पद 335 दिवस रिक्त ठेवल्याचे सांगत हे पद या अधिवेशनात भरले जाणार नसल्याचे संकेत दिले होते. मात्र, महाविकास आघाडीत पुढच्या आठवड्यात हे पद भरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यादृष्टीने आघाडीच्या सर्व आमदारांना हजर ठेवण्याच्या सूचना विधिमंडळ पक्षाचे नेते व गटनेत्यांना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसमध्ये या महत्त्वाच्या पदासाठी आधीपासूनच लॉबिंग सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण,संग्राम थोपटे आणि सुरेश वरपूडकर यांची नावे आघाडीवर असली तरी थोपटे यांची निवड होणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. थोपटे घराणे हे काँग्रेसचे निष्ठावंत आहे. तसेच पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात काँग्रेसकडे एकही मंत्रीपद नाही. याशिवाय नाना पटोले आणि मुंबई अध्यक्षपदी देखील काँग्रेसने भाई जगताप या तरुण नेत्याला संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदीही तरुण आमदार संग्राम थोपटे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा