महाराष्ट्र
घरफोडीतील आरोपी पाच तासात गजाआड : खेड पोलिसांची धडक कारवाई
राकेश कोळी उपसंपादक :-
खेड तालुक्यातील उधळे येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीला अवघ्या पाच तासात खेड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी ही धडक कारवाई आपल्या सहकारी पथकासोबत यशस्वी पार पाडली आहे.
दि २0 जून २०२१ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने फिर्यादी ऋतुजा राजेंद्र वेसवीकर (रा. उधळे, जनाई गावदेवी मंदीराच्या बाजुला, साई ढाबा, ता.खेड जि.रत्नागिरी) यांचे राहते घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील किचनच्या पाठीमागील खिडकीतून फिर्यादी यांचे घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व गोदरेजचा डबा असा एकूण ९५,३००/- रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला. खेड पोलीस ठाण्यात दिनांक २१ जून २०२१ रोजी घरफोडीचा गुन्हा अज्ञाता विरोधात दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाची माहीती मिळताच पोलीस अधिक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काशीद, पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कडु यांच्या तपास पथकाने गुन्हयाचे तपासाची सुत्रे हाती घेवून गुन्हयातील आरोपीबाबत काहीही ठोस पुरावा नसताना गुन्हयाच्या घटनास्थळ परीसरातुन संशयीतांची धरपकड करून सखोल तपास करुन सदरचा गुन्हा सुदेश गणपत महाडीक (वय-३५ वर्षे व्यवसाय-कुक, रा. कळंबणी, वाळंजवाडी ता.खेड जि. रत्नागिरी) याने केल्याचे निष्पन्न करून आरोपीला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील त्याने चोरलेला ७६.८००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आले आहे. सदर आरोपीत याने खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारचे आणखी मालमत्तेविषयक गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा