महाराष्ट्र
सुधागड तालुक्यात 8 तासांत अजगर, नाग आणि घोणस सापांना जीवदान; सर्पमित्रांची अनोखी कामगिरी
सुधागड /कोंडगाव (विशेष प्रतिनिधी )---- राम तुपे
सुधागड पाली तालुक्यातील सर्पमित्रांनी अवघ्या 8 तासांत वेगवेगळ्या ठिकाणी अजगर, नाग आणि घोणस जातीच्या सापांना पकडून जीवदान दिले आहे. या कामगिरीबद्दल वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी तालुक्यातील सर्पमित्रांचे कौतुक केले आहे.
शुक्रवारी (ता.2) पहाटे अडीच्या सुमारास पालीतील उंबरवाडी येथील ऋषभ खंडागळे यांच्या घराच्या माळ्यावर नाग आला होता. या नागाला पालीतील सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांनी शिताफीने पकडले. तर शुक्रवारी (ता.2) सकाळी उद्धर येथील एका फार्म हाऊसच्या स्विमिंग पुलमध्ये घोणस जातीचा विषारी साप पडला होता. तब्बल 2 तास तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. या सापाला येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी पकडून बाहेर काढले. तसेच जाधववाडी येथील दिनेश जाधव यांच्या गुरांच्या वाड्यात गुरुवारी (ता.1) रात्री भला मोठा अजगर शिरला होता. या अजगराला परळीतील सर्पमित्र अमर पाल व शहनवाज शेख यांनी सुखरूप पकडले. हा अजगर सुमारे 7 ते 8 फुट लांब आणि 12 ते 15 किलो वजनाचा होता. त्याला पाहून येथील सर्वांची भंबेरी उडाली होती. या सर्व सापांना तालुका वनविभागाच्या मदतीने सुखरूप जंगलात नेऊन सोडण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्पमित्रांची टीम बनविण्यात आली आहे. या सर्पमित्रांनी आत्तापर्यंत शेकडो साप रेस्क्यू करून त्यांना जीवदान दिले आहे. घरात, मानवी वस्तीत, गुरांच्या वाड्यात साप आल्यास कोणीही घाबरून जाऊ नये. तसेच सापाला कोणतीही दुखापत न करता वनविभागाला कळवावे किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवावे.
समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली-सुधागड
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा