महाराष्ट्र
जून महिन्यात आढळलेत ७२ कोरोना बाधित मुले
राकेश कोळी उपसंपादक :-
२७ मुले आजही कोरोना बाधित, जुलैमध्ये ८ सापडलेत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात डेल्टा-प्लस विषाणूचे रूग्ण ही काही दिवसांपूर्वी सापडल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. एका खेड तालुक्यात गेल्या जून महिन्यात तब्बल ७२ तर जुलैच्या सुरवातीलाच ८ लहान मुले कोरोना बाधित आढळली. २७ मुले आजही बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डेल्टा-प्लस विषाणूचे जिल्ह्यात रूग्ण सापडल्यानंतर मात्र कोरोनाची तिसरी लाट आली की काय असा प्रश्न सर्वानाच पडला होता. त्यात लहान मुले ही कोरोना बाधित आढळत असल्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. कारण तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आली होती. मात्र अद्याप ही तिसरी लाट आली की नाही याबाबत अधिकृतरीत्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॅाक्टर्सने तिसऱ्या लाटेची सुरवात खेड तालुक्यात झाल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खेड तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच लहान मुले बाधित असल्याचे सांगत ही शक्यता खोडून काढली.
गेल्या जून महिन्यात तालुक्यात १४ वर्षाखालील तब्बल ७२ मुले कोरोना बाधित सापडल्याचे सांगितले. यातील २७ लहान मुलांवर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच ८ लहान मुले कोरोना बाधित सापडल्याचे स्पष्ट केले. यामध्ये फुरूस तिथे गावात ३, वावे धामणंदमध्ये ३ तर आंबवलीत २ मुले सापडल्याचे समजते. तसेच खेड तालुक्यात २९६ बाधित रूग्ण असून गेल्या दीड वर्षात २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर सध्या तालुक्यात गृहविलगीकरणात ११८ रूग्ण असून उर्वरित १७८ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तालुक्यात आढळून आलेल्या लहान मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत. ही मुले सध्या संस्थात्मक विलगीकरणात आहेत. खेड तालुक्यात आतापर्यंत ४२ हजार ४ लोकांचे लसीकरण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा