महाराष्ट्र
सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा किडींचे व्यवस्थापन, कृषी विभागाचा सल्ला
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनीधी :-
सोलापूर दि.२३: जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. यावर्षीही किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच सोयाबीनचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
खोडमाशी- खोडमाशीची प्रौढावस्था म्हणजे माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची, आकाराने २ मी.मी.असते. या किडीची अंड्यातून निघालेली बिनपायाची अळी फिकट पिवळसर रंगाची असून अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सोयाबीनची पाने पोखरतात. पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन फांदीचा किंवा खोडाच्या आतील भाग पोखरुन खातात. अशाप्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरुन पाहिल्यास आतमध्ये पांढऱ्या रंगाची अळी किंवा कोष आढळतो. किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजेच सोयाबीनच्या पेरणीनंतर १० ते १५ दिवसाचे पीक असताना झाल्यास प्रादुर्भावग्रस्त झालेले झाड वाळते. झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो. कीडग्रस्त झाडांवरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्यांच्या वजनात घट होवून उत्पादन १६-३० टक्के घटते.
चक्रीभुंगा- ही किड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा वरील अन्नपुरवठा बंद होवून वरचा भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहचते त्यामुळे पूर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधूंनी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.
उपाययोजना
पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत पूर्ण करावी.
पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशा कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडींसह नायनाट करावा, या पद्धतीचा १५ दिवसातून दोनदा अवलंब करावा.
जेथे या किडींचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीच्या वेळेस फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो प्रतिहेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे. सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर ८-१० दिवसांनी प्रतिहेक्टर २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, भरपूर पाऊस आणि त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात. म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी यासंदर्भात जागरुक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत.
पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थायमेथोक्झामची बीज प्रकिया केली नसल्यास सोयाबीनचे पीक १५ दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन ५० टक्के- ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के- ६ .७ मिली किंवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ टक्के-३० मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. चक्रीभुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
चक्रीभुग्यांचा पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसानंतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसात ट्रायझोफॉस ४० ई.सी.१६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस.सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस.सी.३ मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅ.प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा