करोना रुग्णालयात रिकामा ऑक्सिजन सिलेंडर जोडला, कामथे रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - दैनिक शिवस्वराज्य

करोना रुग्णालयात रिकामा ऑक्सिजन सिलेंडर जोडला, कामथे रुग्णालयातील धक्कादायक प्रकार


राकेश कोळी उपसंपादक :-

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. रूग्णांची होणारी हेळसांड, अवेळी मिळणारे जेवण हे कमी होते म्हणून आता रूग्णालय प्रशासनाने रिकामा सिलेंडर चक्क रूग्णांला लावल्याचा धक्कादायक प्रकार कामथे उपजिल्हा रूग्णालयात समोर आला.
चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रूग्णांना प्राणवायू म्हणून ऑक्सिजन सिलेंडर महत्वाची भुमिका पार पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. यामुळेच समाजातील सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत देणगी स्वरूपात ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले होते. अशाच प्रकारे ४ डयुरा सिलेंडर हे जिल्ह्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात भेट स्वरूपात देण्यात आले होते. या ड्युरा सिलेंडरमधून साधारणपणे सहा तास रूग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. मात्र  कामथे उपजिल्हा रूग्णालयात मंगळवारी सांयकाळी एका रूग्णाला ऑक्सिजन सिलेंडर जोडण्यात आला होता. काही वेळाने हा रूग्ण अस्वस्थ झाल्याने हॉस्पिटल प्रशासनाची धावपळ झाली. यावेळी रूग्णाला जोडण्यात आलेला सिलेंडर हा रिकामा असल्याचे समोर आले. सुदैवाने कामथे उपजिल्हा रूग्णालयात १० जम्बो सिलेंडर भरलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकाराला लोटे येथील क्रायो गॅस एजन्सीला जबाबदार धरत स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न कामथे रुग्णालयातील कर्मचारी करीत आहेत. जर गॅस एजन्सीने रिकामा सिलेंडर पाठवला तर तो तपासून घेण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती. हॉस्पिटल प्रशासन हा सिलेंडर आमचा नसून याच्यावर कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर नसल्याचे सांगत गॅस एजन्सीला जबाबदार धरत आहेत. यावेळी ऑक्सिजन सिलेंडर उतरवून घेताना किंवा तो हाताळताना कर्मचाऱ्यांना रिकामा असल्याचे का लक्षात आले नाही? किंवा हा सिलेंडर दुपारीच जोडला नसेल का? ६ तासानंतर सिलेंडर संपल्यावर काही काळ तो न बदलतात ठेवला नसेल कशावरून? हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला नसेल कशावरून? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. क्रायो गॅस एजन्सीकडून कोरोनाच्या पहिल्या आल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यात येत आहेत. गेल्या दीड वर्षात अशा प्रकारची एक ही घटना समोर आली नव्हती. यामुळे गॅस एजन्सीकडून रिकामा सिलेंडर पाठवला असल्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण जसे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना हा सिलेंडर हाताळताना तो भरला आहे की रिकामा आहे हे समजले असेल तसेच गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही लक्षात ही गोष्ट आली असती. यामुळेच या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रारा दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे समोर येत आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads