महाराष्ट्र
शिलाई मशिन पुरवठा योजनेसाठी मागासवर्गीयांनी अर्ज करावेत
प्रतिनिधी/ बालाजी गोरे
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनामधून मागासवर्गीय महिला व पुरुषांना शिलाई मशिन पुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना गावपातळीवरुन राबविण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यामार्फत अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी इच्छुक अर्जदारांनी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज गुरुवार दि.5 ऑगस्ट 2021 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. अर्जदाराला विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे परिपुर्ण भरुन सादर करावा. अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे सर्व मार्गाने एकुण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदाराने अथवा कुटुंबातील व्यक्तीने मागील तीन वर्षात याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक तसेच सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र व सन 2020-21 या वर्षाचे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे विहीत मुदतीत सादर करण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील. अशा अटी व शर्ती आहेत. तरी मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तसेच दिनांकापुर्वी सादर केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. असेही कळविण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा