कोल्हापुरात महाविकास आघाडीत ठिणगी पडणार, राजेश क्षीरसागर यांच्या Whatsapp स्टेटसमुळे खळबळ - दैनिक शिवस्वराज्य

कोल्हापुरात महाविकास आघाडीत ठिणगी पडणार, राजेश क्षीरसागर यांच्या Whatsapp स्टेटसमुळे खळबळ


कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.

कारण आज निवडणूक जाहीर होताच त्यांनी 'कोल्हापुरात पुन्हा भगवाच' म्हणत लावलेले स्टेट्स चर्चेचा विषय ठरले आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. 12 एप्रिलला या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघाचे राजेश क्षीरसागर यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे.

त्यामुळे ते लढण्यास इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडी एकत्र असल्याने आणि ही जागा काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची असल्याने काँग्रेसचा यावर प्रबळ दावा आहे. याचा फटका क्षीरसागर यांना बसण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी केल्याचे संकेत दिले आहेत.

कोल्हापुर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेला दोन खासदार मिळाले असले तरी जिल्ह्यात फक्त एकच आमदार शिवसेनेचा आहे.

(कोल्हापुरात पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगणार, आचारसंहिता लागू, भाजपचे 106 चे 107 आमदार होणार?) राजेश क्षीरसागर हे आक्रमक नेतृत्व असल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीही त्यांच्यावर मर्जी आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने आता शिवसेनेचं श्रद्धास्थान असलेल्या 'मातोश्री'वरुन काय आदेश येणार याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर तिकडे भाजपकडूनही निवडणूक लढवली जाणार आहे. अनेक जण भाजपकडून इच्छुक आहेत. जिल्ह्यात चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाही एकही भाजपचा आमदार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या जागेवर काहीही करून निवडणूक लढवायची, असा निर्धार भाजप नेत्यांचा आहे.

त्यात पाच राज्यांच्या निवडणुकीत यश मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान, या जागेवर शिवसेना-काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार की या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत ठिणगी पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवार यापूर्वीच घोषीत केली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्यासाठी ताकद लावली आहे. विद्यमान आमदार त्यांच्या पक्षाचे असल्याने सतेज पाटील यांचा या जागेवर जयश्री जाधव यांच्यासाठी दावा कायम असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads