महाराष्ट्र
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत.... हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सवाची प्रशासनाकडून जय्यत तयारी : - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर तिरंगा तर 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग असून उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झालेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा (आजादी का) अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होते.
* जिल्ह्यात 6 लाख कुटुंबे
जिल्ह्यात एकूण सहा लाख कुटुंबे असून हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत सर्व घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. महापालिका हद्दीत दीड लाख, ग्रामीण भागात साडेतीन लाख कुटुंबे आहेत तर नगरपालिका हद्दीत एक लाख कुटुंबे आहेत. विविध यंत्रणांकडून साडेतीन लाख राष्ट्रध्वजाची मागणी प्राप्त झालेली आहे.महापालिका हद्दीत महापालिकेच्या वतीने तर ग्रामीण भागात तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी यांच्याकडून ध्वज वितरण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
* विविध कार्यक्रमांचे आयोजन
दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी सात वाजता आसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता रंगभवन येथे वंदे मातरम हा देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विद्यापीठस्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे, जाणीव जागृतीबाबत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 12 ऑगस्टला सकाळी 6 वाजता सायक्लोथॉन आणि 14 ऑगस्टला सकाळी 6 वाजता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
10, 11 आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी शाळा, महाविद्यालयात अनुक्रमे निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात येणार असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी एनसीसी, एनएसएस पथकांसोबत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यादिवशी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्याचे नियोजन असून नागरिकांनी यामध्येही सहभागी व्हावे. पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसा स्थळांची स्वच्छता, प्रत्येक शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
* जिल्हा परिषद अंतर्गत कार्यक्रम
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. घरोघरी तिरंगा ही मोहीम जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सूक्ष्म नियोजन करून राबवली जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दिनांक 9 ऑगस्ट रोजी समुह राष्ट्रगान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांच्या मध्यमातून राष्ट्रगीत गाऊन सर्व विद्यार्थी व नागरिकांमध्ये देश भावनेचे स्फुल्लिंग निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
तसेच दिनांक 10 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये, शाळा यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत किमान 500 वृक्षरोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. दिनांक 10 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक दिवस सैनिकासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व शहीद जवान यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली.
* महापालिका
घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत सोलापूर महानगर पालिकेला दीड लाख तिरंगा ध्वज चे उद्दिष्ट देण्यात आले असून महापालिकेला आज अखेरपर्यंत 80 हजार झेंडे उपलब्ध झालेले आहेत व त्यातील 60 हजार वितरित करण्यात आलेले आहेत. महापालिकेच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिर व प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले असून एका झेंड्यासाठी 24 रुपये दर निश्चित केलेला आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
तसेच महापालिकेच्या हद्दीत शंभर फूट उंचीचा तिरंगा ध्वज फडकवणे बाबत नियोजन सुरू असून ध्वजस्तंभ 12 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होईल. तसेच अमृत महोत्सवांतर्गत सीएसआर फंडातून समशानभूमी साठी विद्युत दाहिनी उपलब्ध करून दिलेली आहे व महापालिकेच्या रुग्णालयात सुधारणा कामे सुरू असल्याची माहितीही श्री. शिवशंकर यांनी दिली. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिका स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येऊन दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सोलापूर शहरात पोलीस विभागामार्फत 75 किलो मीटर दौड, वृक्षारोपण, 5 हजार तिरंगा झेंड्याचे वाटप, सामाजिक सलोखा कार्यक्रम, माहिती तंत्रज्ञान विषयक जन जागृती, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण, तिरंगा ध्वज घेऊन बाईक रॅली, सायकल रॅली आदी उपक्रम राबवले जात आहेत. पोलीस विभाग या महोत्सवात पूर्णपणे सहभागी असून पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली.
* ग्रामीण पोलिस
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रम जिल्ह्यातील सर्व 25 ग्रामीण पोलीस स्टेशन मधून राबवला जात आहे. सर्व पोलीस लाईन मध्ये तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्व पोलीस स्टेशनची स्वच्छता मोहीम राबवली जात असून फ्लॅग मार्च ही घेण्यात आलेला आहे. पोलीस विभागाच्या वतीने 75 किलो मीटर दौड चे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
अमृत महोत्सव अंतर्गत परिवर्तन अभियान अंतर्गत सोलापूर शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी तयार केलेल्या कपड्यांचे तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच रेल्वे स्टेशन मध्ये कपडे विक्री साठी बंजारा स्टॉल लावण्यात येणार असून अवैद्य दारू विक्री करणाऱ्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याची श्रीमती सातपुते यांनी दिली.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा व स्वराज्य महोत्सव कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सर्व मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा