महाराष्ट्र
पोखरापूरच्या जगदंबा मंदिराबाबत सामंजस्यातून मार्ग काढावा ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : पोखरापूर ता. मोहोळ येथील जगदंबा मंदिर हे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 च्या संपादित क्षेत्रात येत आहे. प्राचीन मंदिराबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि ग्रामस्थांनी लोकभावना आणि सामंजस्याच्या भावनेने मार्ग काढावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या.
जगदंबा देवीचे मंदिर जतन करण्याबाबत आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक केशव घोडके, भूसंपादन उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अरूणा गायकवाड, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष धोंडिबा गेनू उन्हाळे, शिवाजी बाबर, दगडू आगलावे, श्रीधर उन्हाळे उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी ग्रामस्थ, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुरातत्व विभागाची भूमिका ऐकून घेतली. राजमार्ग प्राधिकरणने पुरातत्व खात्याचे ना हरकत परवाना घेणे आवश्यक आहे. हे प्राचीन मंदिर असल्याने याचे जतन होणे गरजेचे आहे.
पुरातत्व विभागाने मंदिराला हानी होऊ नये, यासाठी प्रस्तावित महामार्गाचे पुर्नसंरेखन करणे गरजेचे असल्याचे सुचविले आहे. या पर्यायावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांना मंदिर आहे त्या ठिकाणी रहावे, पुरातत्व खात्याच्या आदेशाचे पालन व्हावे, याबाबत निवेदन दिले.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा