महाराष्ट्र
प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) ची 31 डिसेंबरअखेर लाभार्थी मंजुरी प्रक्रिया
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सन 2016-17 ते 2020-21 या कालावधीतील 6399 इतक्या लाभार्थींना मंजुरी देणे बाकी आहे. ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार ही मंजुरीची प्रक्रिया 31 डिसेंबर 2022 अखेर १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील ज्या लाभार्थींना जागा उपलब्ध होऊ शकते, त्यांनी आपल्या ग्रामपंचायत व पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - केंद्रपुरस्कृत घरकुल योजना राबवण्यात येते. ज्या लाभार्थींनी जागा खरेदी केलेली आहे, त्यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या योजने अंतर्गत ज्या पात्र लाभार्थीचे नाव यादीत आहे, परंतु ते जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत, त्यांनी तात्काळ जागा उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जे लाभार्थी संपर्क साधणार नाहीत, त्या घरकुलांचे उद्दिष्ट दुसऱ्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा