चला जाणूया नदीला… नदी संवाद यात्रा…उपरी, वाडीकुरोली, शेळवे, भंडीशेगावमध्ये लोकसहभागाचा जागर - दैनिक शिवस्वराज्य

चला जाणूया नदीला… नदी संवाद यात्रा…उपरी, वाडीकुरोली, शेळवे, भंडीशेगावमध्ये लोकसहभागाचा जागर


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : ‘चला जाणूया नदीला' उपक्रमांतर्गत नदी संवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उपरी, वाडीकुरोली, शेळवे, भंडीशेगावमध्ये लोकसहभागातून जलजागर करण्यात आला.
    उपरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विलासराव देशमुख माध्यमिक विद्यालयात कलश आणि राष्ट्रध्वजाचे पूजन केल्यावर नदी संवाद यात्रेला सुरवात झाली व तिची सांगता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात झाली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपरीकरांच्या कासाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्जीवनातील योगदानाचे कासाळगंगा समन्वयक बाळासाहेब ढाळे यांनी कौतुक केले. सतीश नागणे, सरपंच ज्ञानेश्‍वर नागणे, उपसरपंच महेश नागणे, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक साहेबराव नागणे, पोलिस पाटील दत्तात्रय हेंबळे, शाळा समितीचे अध्यक्ष गोरख नागणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन खाडे, कृषि सहाय्यक श्री. चव्हाण, ग्रामसेवक अमर वाघमोडे आदि उपस्थित होते.
     नदी संवाद यात्रेनिमित्त निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. ‘मुली वाचवा, देश वाचवा', असा संदेश कलांमधून देण्यात आला. चित्रे आणि रांगोळ्यांमधून कासाळगंगामधील होड्यांची छानशी कला विद्यार्थ्यांनी सादर केली. ‘पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे महत्त्व तू जाण', अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी दिली. यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
            वाडीकुरोलीकरांची योगदानाची ग्वाही
     कासाळगंगा अविरल-निर्मळ वाहण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या चला जाणूया नदीला उपक्रमात वाडीकुरोलीकरांतर्फे लोकसहभाग पूर्णतः दिला जाईल, अशी ग्वाही समाधान काळे यांनी दिली. माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामध्ये सरपंचा सुप्रिया काळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सोमेश्‍वर हरसुरे, लघू पाटबंधारेचे डी. जे. कारंडे, उपअभियंता श्री. शिंदे, कृषि विस्तार अधिकारी श्री. डोके, सहाय्यक श्री. खरात, तलाठी कैलास गुशिंगे, उपसरपंच अर्चना काळे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता काळे, लाडाबाई काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच सुभाष कुंभार, मुख्याध्यापक खरात आणि दुपडे, केंद्रप्रमुख खाडे, ग्रामसेवक शौकत मुलाणी आदिंचा सहभाग राहिला.
     शेळवे येथील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होत ‘सेव्ह वॉटर, सेव्ह अर्थ' असा संदेश दिला. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि शेळवे कृषि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या सहभागातून नदी संवाद यात्रा झाली. त्यानंतर स्पर्धांमधील विजेत्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. सरपंचा सुनिता गाजरे, उपसरपंच किरण गाजरे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नागटिळक, रामचंद्र गाजरे, बाळासाहेब गाजरे, मुख्याध्यापक मोहन गाजरे, शांताराम गाजरे, समाधान गाजरे, ग्रामसेवक अविनाश ढोपे आदी उपस्थित होते.
     तिसऱ्या दिवसाच्या नदी संवाद यात्रेची सांगता भंडीशेगाव येथे झाली. या नदी संवाद यात्रेत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, श्रीनाथ विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सरपंचा मनिषा येलमार, उपसरपंच विजय कदम, प्रभाकर जाधव, मंगेश ननवरे, कृषी सहाय्यक श्री. यादव, ग्रामसेवक गोरख नरसाळे आदि उपस्थित होते.
    नदी संवाद यात्रेची माहिती प्रकल्पात सहभागी झालेल्या गावांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवण्यासाठी ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी आणि पत्रकार दीपक धोकटे यांनी सहभाग दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उद्या शुक्रवारी (ता. ३०) अखेरच्या दिवशी कासाळगंगा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव (ता. माळशिरस) येथे नदी संवाद यात्रा होईल.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads