महाराष्ट्र
मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकांची भूमिका महत्त्वाची :- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पौष्टिक तृणधान्य सेवनाला पूर्वापार महत्त्व आहे. तंदुरूस्तीसाठी पौष्टिक तृणधान्यांचा दैनंदिन आहारात समावेश गरजेचा आहे. मानवी आरोग्यवर्धनात पौष्टिक तृणधान्य पिकाची भूमिका महत्त्वाची असून, तृणधान्य पिकांतील पोषणमूल्ये व त्यांचे मानवी आहारातील महत्त्व जनमाणसांत पोहोचण्याची आवश्यकता आहे. याबाबत नागरिकांमध्ये विविध स्तरांतून जनजागृती निर्माण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे तसेच तृणधान्याचे विविध प्रकार बनविणारे उद्योजक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, नागरिकांचा कोरोनापश्चात तंदुरूस्त राहण्यावर भर असल्याचे चित्र दिसत आहे. याकरिता डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे आहारामध्ये बदलही केला जात आहे. तसेच पूर्वीच्या पध्दतीने बनविले जाणारे खाद्यपदार्थ व सेंद्रीय पध्दतीने पिकविलेले धान्य खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने शरीरासाठी तृणधान्यांची उपयुक्तता लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. त्याबाबतची जनजागृती करावी, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, तृणधान्यावर प्रक्रिया करून जे खाद्य पदार्थ बनविले जातात, त्या पदार्थाचा आपण रोजच्या खानपानामध्ये समावेश केला पाहिजे. तसेच, तृणधान्यावर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविणाऱ्या उद्योजकांनाही आवश्यक ती मदत करून, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, तृणधान्यावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ बनविणाऱ्या उद्योजकांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेऊन त्यांना प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी यावेळी तृणधान्ये, त्यांची उपयुक्तता तसेच, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षांतर्गत देशपातळीपासून गावपातळीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, भारत हा पौष्टिक धान्य पिकवणारा जगातील एक प्रमुख देश आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पने अंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे हा प्रमुख हेतू आहे. त्यादृष्टीने कृषि विभाग व संलग्न विभागांच्या समन्वयाने आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये कृषि महोत्सवाचे आयोजन, कार्यशाळा, पौष्टिक तृणधान्य दालन, शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम, मिलेट ऑफ द मन्थ संकल्पना, प्रभात फेरी, रोड शो, बाईक रॅली, मिलेट दौड,पाक कृती/पाक कला स्पर्धांचे आयोजन अशा विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये असणार आहे. पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व तृणधान्यापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थाबाबत माहिती दिली. ‘मिलेट ऑफ दि मंथ’ संकल्पने अंतर्गत भोगी व संक्रात सणानिमित्त जानेवारी महिना बाजरी या पिकाकरिता समर्पित असून या अनुषंगाने बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व सांगणाऱ्या पत्रकाचे अनावरण जिल्हाधिकारी यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा